बंद

    मा. मंत्री (वस्त्रोद्योग), महाराष्ट्र राज्य यांचा संदेश

     

    Textile Minister

    श्री चंद्रकांत पाटील
    ​मा. मंत्री (वस्त्रोद्योग)

    मला हे सांगताना अभिमान वाटतो की आपल्या राज्यात भारतातील सर्वात चैतन्यशील आणि गतिमान वस्त्रोद्योग आहे, जो आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. 17 व्या शतकापासूनच्या प्रदीर्घ आणि समृद्ध इतिहासासह, महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग क्षेत्र पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही क्षेत्रांच्या मजबूत उपस्थितीने विकसित झाले आहे. देशाच्या एकूण वस्त्रोद्योग आणि कापड उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा 10.4% आहे आणि एकूण रोजगारात 10.2% वाटा आहे.

    महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग अधिक स्पर्धात्मक बनवण्याच्या उद्देशाने राज्याने यापूर्वी दोन वस्त्रोद्योग धोरणे जाहीर केली आहेत, ज्यामुळे राज्यात रोजगार आणि आर्थिक वाढ झालेली आहे. आता, राज्याने नुकतेच एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२०२८ जाहीर केले आहे.

    वस्त्रोद्योगातील शाश्वतता वाढवणे हे वस्त्रोद्योग विभागाच्या प्रमुख प्राधान्यांपैकी एक आहे. रिडयुस, रियूज आणि रिसायकल या 3-आर मॉडेलच्या माध्यमातून पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करण्यास आणि वस्त्रोद्योग उत्पादन प्रक्रियेत पाणी आणि ऊर्जा संवर्धनाच्या उपायांची अंमलबजावणी करण्यास आम्ही सक्रियपणे प्रोत्साहन देत आहोत.

    याव्यतिरिक्त, राज्य सामायिक सुविधा केंद्रे, पायाभूत सुविधा सहाय्य आणि या क्षेत्राच्या विकासासाठी अनुकूल वातावरणासह समर्पित तांत्रिक वस्त्रोद्योग संकुले सुरू करणार आहे.

    याशिवाय, महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग उत्पादनांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. आपल्या राज्यात उत्पादित होणाऱ्या उत्कृष्ट वस्त्रोद्योग उत्पादनांचे प्रदर्शन करण्यासाठी हा विभाग व्यापार मेळावे, प्रदर्शने आणि खरेदीदार-विक्रेत्यांच्या भेटींचे आयोजन करणार आहे. विविध उद्योग संघटना आणि सरकारी संस्थांच्या सहकार्याद्वारे, बाजारपेठेतील प्रवेश वाढवणे आणि निर्यातीला चालना देणे हे आमचे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे राज्याच्या सर्वांगीण आर्थिक विकासात योगदान मिळेल.

    हा विभाग आपल्या वस्त्रोद्योग क्षेत्राची वाढ, शाश्वतता आणि जागतिक स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल. संशोधन आणि नावीन्यता, शाश्वतता, कौशल्य विकास आणि आपल्या वस्त्रोद्योगातील भागधारकांचे सक्षमीकरण यावर लक्ष केंद्रित करून, महाराष्ट्राला एक अग्रगण्य वस्त्रोद्योग केंद्र म्हणून स्थान देण्याचे, गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे आणि राज्याच्या आर्थिक समृद्धीला चालना देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.